Login

"काय माझा गुन्हा...?" भाग १६

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग १६


“तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे…”
गौरवीचा आवाज थरथरतो, पण शब्द धारदार असतात...

“पण कोणाच्या विरोधात उभी राहू…?
ज्याच्यावर जीव ओवाळून प्रेम केलं,
ज्याच्यासाठी सगळं घरदार, नातीगोती, माझे आईबाप, माझं करिअर सर्व काही मागे सोडलं त्याच्या विरोधात उभी राहू…?
की ज्यांनी मला कधीच सून, वहिनी म्हणून स्वीकारलंच नाही...
ज्यांना कधी माझं अस्तित्वच जाणवलं नाही… त्यांच्या विरोधात उभी राहू…? सांग ना कोणाच्या विरोधात उभी राहू...?"

ती क्षणभर थांबते... डोळ्यांत भीती दाटते...
“आणि तुला सुद्धा कळालं ना मी कोण आहे…
तर तू सुद्धा मला हात न लावता, इतरांसारखाच घराबाहेर काढशील…”
आरव तिच्याकडे एकटक पाहतो...

घरात सर्वत्र क्षणभर शांतता पसरते...
मग तो थेट, निर्भीडपणे तीला विचारतो...
“अच्छा… कोण आहेस तू…? चोर...? गुंड...? खुनी...? की वैश्या…?”

आरवचे बोलणं ऐकून गौरवी थोडी दचकते...

आणि तीचे बोलण्यासाठी ओठ थरथरतात...
“त्यातली एक जरी असती तरीही…”
तिचा आवाज तुटतो...
“…तरी कदाचित कोणाला मला हाकलण्याचं कारण मिळालं नसतं… पण जात नावाचा असा हा आजार आहे ना... तो आईच्या गर्भात असतानाच त्या गर्भाला होतो... ते शेवटचे श्वास घेई पर्यंत... आणि त्या मधल्या आयुष्यात तुम्हाला जी वागणूक मिळते ना ती अशी वाटते कि... " काय माझा गुन्हा...?" गौरवी...

आरव तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहतो... प्रत्येक शब्द त्याच्या छातीत खोल रुतत जातो...
त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, जबड्याच्या स्नायूंवर ताण येतो... क्षणभर तो काहीच बोलत नाही.
जणू राग नाही... तर समजून घेतलेली वेदना त्याच्या आत उफाळत असते...

मग तो हळूच, पण ठाम आवाजात म्हणतो...
“ जात हा आजार नाही... कारण आजारी आहे तो समाज… जो जन्माआधीच माणसाची किंमत ठरवतो...”

तो थोडा थांबतो.
तिच्याकडे पाहतो... तो तिला आदेश देत नाही, दया दाखवत नाही..., फक्त समोर बसलेल्या माणसाशी त्याच्या कलेने बोलण्याचा प्रयत्न करतो...

“आईच्या गर्भात असताना नाही, तर जन्मानंतरच्या प्रत्येक क्षणी
हा समाज त्या आजाराची लागण करतो...
कधी ‘तू कमी आहेस’ म्हणून, तर कधी ‘तू आमची नाहीस’ म्हणून, आणि कधी ‘तू प्रश्न विचारू नकोस’ म्हणून...”

तो आवाज थोडा कडक करत बोलतो...
“पण एक लक्षात ठेव... तु जन्माला आलीस म्हणून दोषी नाहीस..., प्रेम केलंस म्हणून सुद्धा दोषी नाहीस...,
आणि स्वतःचा सन्मान मागितलास म्हणून तर अजिबातच तु दोषी ठरत नाहीस...”

आरव थोडं पुढे सरकतो, पण अजूनही अंतर राखून...
“आणि मी तुला घराबाहेर का काढेन…?
मी नाही तुला कधी घराबाहेर काढणार... कारण मला तुझी जात माहित नाही,‌ मला फक्त इतकंच दिसतं कि समोर बसलेली ही स्त्री खूप काही सहन करूनही आजही स्वतःला दोष देत आहे...”

तो थोडं हसतो कटु, पण आत्मविश्वासाने...
“आणि ऐक… मी तुला तुझी जात विचारून वाचवलेलं नाही.
मी तुला स्त्री म्हणून नाही, ‘दया’ म्हणून नाही... तर मी तुला माणूस म्हणून वाचवलं. आणि माणूस म्हणून
तुला कुणीही घराबाहेर काढू शकत नाही तू स्वतःला बाहेर काढेपर्यंत...”

तो थोडा थांबतो, आवाज स्थिर करतो...
"आणि अजून ऐक…
ज्या समाजाला तुझं अस्तित्व मान्य नाही,
त्याच्या परवानगीने तुला जगायची गरज नाही...”


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all